प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचा उत्साहपूर्ण कार्यक्रम.
श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव: प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये दहीहंडीचा जल्लोष.
प्राथमिक गट, उच्च प्राथमिक गट आणि माध्यमिक गट या गटांतील विद्यार्थ्यांनी शाळेत सजवलेल्या उंच दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचले. विद्यार्थ्यांनी ‘गो गो गोविंदा’, ‘मच गया शोर सारी नगरी में’ आणि ‘कृष्ण जन्माला’ यांसारख्या लोकप्रिय दहीहंडी गीतांवर आधारित समूह नृत्य सादर केले. या नृत्यांनी उपस्थितांचे मन जिंकले आणि श्रीकृष्णाच्या बाललीलांचा उत्साहपूर्ण आनंद सर्वांना अनुभवायला मिळाला. शाळेच्या प्रांगणात संगीतमय वातावरणात दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धेने सर्वांना खिळवून ठेवले.
श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले, “दहीहंडी हा उत्सव श्रीकृष्णाच्या खट्याळ आणि प्रेमळ स्वभावाचे प्रतीक आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना, धैर्य आणि उत्साह वाढवतो. यामुळे विद्यार्थ्यांना आपली सांस्कृतिक मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळते.”
शाळेचे मुख्याध्यापक श्री. कार्तिक रत्नाला यांनी सांगितले, “जन्माष्टमी आणि दहीहंडीचा हा उत्सव विद्यार्थ्यांना सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची ओळख करून देतो. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग पाहून आम्हाला अभिमान वाटतो.”
या कार्यक्रमात शिक्षिका प्रगती क्षीरसागर, मीरा मिरिंडा, तसेच पालक अशोक नाईकनवरे, सुवर्णा नाईक नवरे रोहिणी बोराडे, राहुल राजूरकर, संपदा राजूरकर आणि तनुश्री दास, साधना खरात, अक्षय व ज्योती नाईक नवरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे आणि सादरीकरणाचे कौतुक केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नृत्य आणि दहीहंडी फोडण्यासाठी मार्गदर्शन केले, तर पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
प्रिन्स इंग्लिश स्कूलमधील या दहीहंडी कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना आणि सांस्कृतिक जागरूकता वाढवण्यास मदत केली. शाळेच्या सचिव डॉ. सविता रोडगे आणि प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे यांनीही या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सौ. कल्पना भाबट यांनी केले.
Comments
Post a Comment