विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळातही भविष्य घडवावे: डॉ. संजय रोडगे.
प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे तालुकास्तरीय शालेय
खो-खो स्पर्धा यशस्वी.
विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळातही भविष्य घडवावे: डॉ. संजय रोडगे.
सेलू, दि. १० सप्टेंबर २०२५: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू येथे यशस्वीपणे संपन्न झाल्या. या स्पर्धेचे अध्यक्षस्थान श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी भूषवले, तर उद्घाटक म्हणून केशवराज सोळंके, संचालक, मार्केट कमिटी उपस्थित होते. तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक, श्री. ठोंबरे, श्री. झिंजान आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. कार्तिक रत्नाला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय क्रीडा दिन आणि मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्पर्धेचे प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक यांनी केले. सूत्रसंचालन श्री. जुलाहा खुद्दूस यांनी केले, तर आभार प्रमोद गायकवाड यांनी मानले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. संजय रोडगे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना सांगितले, “विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळातही आपले भविष्य निर्माण करावे. क्रीडा क्षेत्रातही यश मिळवता येईल आणि ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की, श्रीराम प्रतिष्ठान क्रीडा आणि खेळाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल. “क्रीडा विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकाग्रता आणि सांघिक भावना विकसित करते, जी शिक्षणासोबत जोडली तर उज्ज्वल भविष्य घडते,” असे डॉ. रोडगे यांनी सांगितले.
या स्पर्धेत विविध शाळांतील खेळाडूंनी भाग घेतला. स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री. सुरज शिंदे, जगदीश लहाने, सत्यम बुरकुले, राजेश राठोड, सिद्धेश्वर बहिरट, दीपक जोरगेवार आणि कपिल ठाकूर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले. शाळेच्या सचिव सौ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, शिक्षिका सौ. प्रगती क्षीरसागर आणि इतर शिक्षक-विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेने तालुक्यातील शालेय क्रीडा क्षेत्राला चालना मिळाली. डॉ. संजय रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रिन्स इंग्लिश स्कूलने क्रीडा आणि शिक्षणाच्या एकात्मिक विकासावर भर दिला. स्पर्धेच्या निकालानुसार विजेती संघांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळाली, ज्यामुळे खेळाडूंच्या भविष्यासाठी नव्या संधी उघडल्या गेल्या.
Comments
Post a Comment